गुरांच्या कत्तलीप्रकरणी पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

क्राईम धरणगाव

जळगाव ::> पाळधी येथील रंगारी मोहल्ल्यात अवैधरीत्या गुरांची कत्तल सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा मारला होता. या वेळी तेथून २१ गुरे ताब्यात घेतली. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख अजगर शेख गुलाम कुरेशी, एजाज शेख शब्बीर कुरेशी, रिजवानाबी मुन्ना कुरेशी, मुजाहिज शेख जाबीर कुरेशी (सर्व रा. पाळधी) व वसीम खान अस्लम खान (रा. मालेगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण मिळून पाळधीतील रंगारी मोहल्ल्यात गुरांची कत्तल करून मांस विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार बुधवारी दुपारी ४ वाजता फौजफाट्यासह पोलिस रंगारी मोहल्ल्यात पोहोचले. तेथे २१ जिवंत गुरे व काही गुरांचे मांस, कातडी व शिंगे मिळून आली. दरम्यान, पोलिसांनी १ लाख ५ हजार रुपये किमतीची २१ गुरे ताब्यात घेऊन पांजरपोळ गोशाळेत पाठवली आहेत. तसेच गुरांची वाहतूक करण्यासाठी वापरलेली चारचाकी जप्त केली आहे. तर गुरांचे मांस, कातडी, शिंगे नष्ट करण्यात आली. पाळधी दूरक्षेत्राचे गजानन महाजन यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कत्तल करणाऱ्या या लोकांनी काही गुरे चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील रामानंदनगर व एमआयडीसी व भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून काही गुरे चोरीस गेली आहे. या प्रकरणी संबंधित गुरांच्या मालकांनी गुरुवारी त्या-त्या पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली आहे. गुरांची चोरी करून चारचाकी वाहनातून तस्करी होत असल्याचा हा प्रकार या कारवाईतून समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *