रोझोदा येथील दाम्पत्याची हत्या करणारा शेजारीच निघाला ; संशयित आरोपीला अटक

क्राईम

रावेर : :> रोझोदा, ता.रावेर येथील ओंकार पांडूरंग भारंबे (९०) व सुमनबाई ओंकार भारंबे (८४) या पती-पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. अवघ्या बारा तासातच पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून परेश खुशाल भारंबे (३२, रा. रोझोदा) या तरुणाला रात्री ११ वाजता अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश हा या वृध्द दाम्पत्याच्या शेजारीच वास्तव्याला आहे, त्यामुळे त्यांच्याकडील पैशाचा अंदाज त्याला होता. आपल्यावरील कर्ज फेडण्यासाठी या घरात चोरी करण्याचे नियोजन करुन बुधवारी मध्यरात्री त्याने भारंबे दाम्पत्याच्या घरात प्रवेश केला.

नोटांचे काही बंडले चोरुन बाहेर पडत असतानच या दाम्पत्याला जाग आली. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता परेश याने सोबत नेलेल्या सुरीने सपासप दोघांची गळे चिरले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी घटनास्थळ गाठले.

सकाळपासूनच रोझोद्यात ठाण मांडून तपासाची चक्रे फिरवली. फॉरेन्सिक व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वानाने थेट परेशच्या घरातच माग दाखविल्याने तपासाची दिशा मिळाली व त्यानंतर फॉरेन्सिक लॅबचाही उपयोग करण्यात आला. सर्व भौतिक पुरावे जुळून आल्यानंतर परेशला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *