जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांचा १३० क्विंटल कापूस घेऊन ट्रकचालक रफूचक्कर

क्राईम निषेध पारोळा रिड जळगाव टीम शेती

पारोळा >> शहरातील चार शेतकऱ्यांचा १३० क्विंटल कापूस घेऊन चालक ट्रकसह पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पारोळा शहरातील योगेश भोसले, पंढरीनाथ पाटील, किशोर दुसाने, नामदेव वाघ (जळगाव) या चारही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन १३० क्विंटल कापूस गुजरात राज्यातील कडी येथील एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी अक्कलकुवा (ता.नंदुरबार) येथील श्रीराम रोडलाइन्स या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ट्रक (क्रमांक आरजे.२२-०६५६) भाड्याने लावला.

ट्रक चालक सारवान राम याला ठरलेल्या ३१ हजारांपैकी १६ हजार रुपये भाडे दिली. तसेच आम्ही खासगी वाहनाने सोबत येतो, असे सांगून पुढे जाण्याची सूचना केली. त्यानुसार १५ नोव्हेंबरला साडेपाच वाजेच्या सुमारास पारोळा शहरातून निघालेला ट्रक दुसऱ्या दिवशी सायंकाळी कडी येथे पोहोचणे अपेक्षित होते.

या दरम्यान शेतकरी योगेश भोसले यांचे भाऊ महेश भोसले यांनी ट्रक चालक सारवान राम याला संपर्क साधला. मात्र, त्याचा मोबाइल बंद आढळला. यानंतर ट्रान्सपोर्टचे मालक विनोद जैन यांना संपर्क केला. त्यांचाही ट्रक चालकाशी संपर्क झाला नाही. त्यामुळे याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ट्रक चालक सारवण याचेवर गुन्हा दाखल झाला.