बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा खाटेवरून पडून झाला मृत्यू

अपघात क्राईम महाराष्ट्र

डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे महिला दगावल्याचा आरोप

बीड >> बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या ६० वर्षीय महिलेचा सोमवारी मध्यरात्री खाटावरून खाली पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाला. यात डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप करत नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयासमोर आक्रोश करत कारवाईची मागणी केली. जिल्हा रुग्णालयानाने हे आरोप फेटाळून लावले असून महिलेची प्रकृती चिंताजनक होती म्हणून तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले.

बीड शहरातील संत नामदेवनगर भागातील ६० वर्षीय महिला २० नोव्हेंबरला सकाळी कोरोना संशयित म्हणून मदर वॉर्डमध्ये दाखल झाली. सुरुवातीपासूनच तिची प्रकृती चिंताजनक होती. अँटिजन तपासणीत तिचा अहवाल निगेटिव्ह आला तर आरटीपीसीआरच्या अहवालात ती कोरोना पॉझिटिव्ह आली.

यावेळी नातेवाईकही सोबत होते. परंतु याच वार्डमधील डॉक्टर, परिचारिकांनी नातेवाइकांना रिपोर्ट आणण्यास पाठवले. तोपर्यंत महिला खाटावरून खाली पडली आणि तिच्या डोक्याला इजा झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता क्र. १ मध्ये दाखल केले. येथे सोमवारी रात्री १२.३० वाजता तिचा अखेर मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयासमोर आक्रोश केला. डॉक्टर, कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी केली.