जळगावकरांनो आता तरी जागे व्हा!

Jalgaon जळगाव ब्लॉगर्स कट्टा

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी ६७० चा आकडा पार केला आहे. कोरोना चा उद्रेक ,रूप किती भयानक आहे हे आतातरी जळगावकरांनी समजून घ्यायला पाहिजे.जळगावकरांनो आतातरी जागे व्हा.गेल्या दोन महिन्यांपासून असलेलं लॉकडाऊन आपण किती स्वयंशिस्तीने पाळले याचा विचार करा.जर पाळले असते तर आज इतकी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली नसती.असाच जर आपला मुक्त संचार राहिला तर येत्या ४-५ दिवसात आपण एक हजाराचा आकडा नक्की पार करु,की जे भूषणावह नाही.


कोरोनाला रोखणे, ही साखळी तोडणे हे समाज्यातील प्रत्येक घटकाच्या हातात आहे.मला काही होत नाही, मी बाहेर फिरु शकतो, आणि किती लोक विनाकारण फिरत आहेत असे म्हणणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरुध्दच्या या लढ्यात नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. ”मी विनाकारण बाहेर पडणार नाही आणि कुटुंबातील सदस्याला देखील बाहेर पडू देणार नाही” अशी प्रतिज्ञा घेण्याची वेळ आली आहे.आत्ताच्या घडीला किमान एक आठवडा स्वयंस्फुर्त जनताकर्फ्युची अत्यंत गरज आहे.

यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी, स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. आठवडाच्या जनता कर्फ्यु दरम्यान नागरिकांना लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि तरुण स्वयंसेवकांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे.येणाऱ्या पुढच्या आठवड्यात या जनताकर्फ्यु चे फायदे आपणास नक्कीच मिळतील.कोरोना रुग्ण वाढीचा दर निश्चितच कमी झालेला असेल.


कोरोना हा विषाणू जळगाव शहरापुरता मर्यादित राहिला नाही .अगदी खेडोपाडी देखील या विषाणू ने आपले पाय पसरविले आहेत. खेड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होणे ही आपणा सर्वांसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे,कारण याच खेड्यात आपला गोरगरीब वर्ग, आपला पोशिंदा,कष्टकरी शेतकरी राहतो. त्याची काळजी घेणं आपली सर्वांची जबाबदारी आहे.आपला पोशिंदा शेतकरी धोक्यात म्हणजे आपणही धोक्यात हे समजून घेणे गरजेचे आहे.

अन्यथा हातची वेळ निघून जाईल.त्यासाठी दोन प्रकारे आपण कार्य करू शकतो. ग्रामपंचायत स्थरावर, ग्रामीण भागातून शहरात कामधंद्यासाठी जाणाऱ्यांची यादी बनवून ,दर आठवड्यात त्यांची आरोग्य तपासणी करू शकतो.असे केल्याने शहरातून चुकून येणारे संक्रमण आपण वेळीच जाणून घेऊ शकतो आणि संशयित रुग्णाची योग्य त्या दिशेने तपासणी करून आपले गाव सुरक्षित ठेऊ शकतो.

यासाठी ग्रामपंचायत स्थरावर सेवाकार्य करणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे जळगाव शहरात असणाऱ्या भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, औषधी दुकानदार यांची देखील महानगरपालिका, नगरपालिका स्थरावर तपासणी करणे गरजेचे आहे कारण या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांकडे शहरातील सर्व लोकांचे येणे जाणे सुरू आहे. असे केल्याने संशयितांची आपण वेळीच योग्य ती तपासणी करून संक्रमण रोखू शकतो. त्यासाठी नागरिकांची, ग्रामीण,शहरी लोकप्रतिनिधींची, प्रशासनाला खंबीर साथ मिळणे गरजेची आहे.


कोरोना या विषाणूवर जगभरात अजूनही रामबाण इलाज सापडलेला नाही. कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना द्वारे आपण रुग्णसंख्या रोखू शकतो. जगभरातील,जळगावातील डॉक्टर्स आपल्या अनुभवातून किंवा शासनाकडून असलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे स्वतःचे जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करीत आहेत.

कोरोनाग्रस्त रुग्ण हा १४ दिवस रुग्णालयात असतो ,तोपर्यंत आणखीन अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत, मात्र सैन्यरूपी डॉक्टर्स आहे तेव्हढेच आहे. युद्धाच्या काळात सैनिकांची जशी भरती करतो तशी भरती या डॉक्टरांची करता येत नाही. तेव्हा आपण जागरूक नागरिक म्हणून कोरोनाची साखळी घरात राहून तोडू शकतो.आपल्या कष्टकरी ,पोशिंद्याला, शेतकऱ्याला संक्रमणापासून वाचवू शकतो, सैन्यरूपी डॉक्टरांवरील भार कमी करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला अनमोल जीव वाचवू शकतो. तेव्हा जळगावकरांनो ..जागे व्हा आणि आनंदाने जगा.

डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ञ, जळगाव. ९४२३१८७४८६.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *