चोपड्यात रस्त्यावर फिरणे पडले महागात ; चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले ;गुन्हा दाखल

क्राईम चोपडा निषेध पाेलिस

चोपडा राजेंद्र पाटील टीम ::> विना क्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी शहरातील चोपडा-अडावद रस्त्यावरील जुना माचला पुलाजवळ पतीसह पायी फिरणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मणीमंगळसूत्राची पोत हिसकावून पोबारा केला. २१ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता ही घटना झाली.

गजानन पंडित पाटील (वय ३९, रा.आडगाव ता.चोपडा, ह.मु.रामनगर,चोपडा) हे पत्नी सुरेखा पाटील यांच्यासोबत शहरातील चोपडा-अडावद रस्त्यावरील जुन्या माचला पुलाजवळ २१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पायी फिरत होते.

यावेळी त्यांच्या मागून सुमारे २२ वर्षे वयोगटातील सावळ्या रंगाचे दोन तरुण विना नंबरच्या लाल काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर आले. त्यांनी सुरेखा पाटील यांच्या गळ्यातील १९ ग्रॅम वजनाचे आणि ४७ हजार ५०० रुपये किंमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेत पलायन केले.

या घटनेमुळे पायी फिरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गजानन पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर करत आहेत.