कापूस खरेदीसाठी कट्टी लावू नका, शेतकऱ्यांची लूट थांबवा : शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची चोपड्यात मागणी

Politicalकट्टा आंदोलन कट्टा चोपडा निषेध शेती

राजेंद्र पाटील चोपडा प्रतिनिधी >> यंदा शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहेत. मोठ्या कष्टाने त्यांनी कापूस पिकवला आहे. त्या कष्टाचे मोल त्याला मिळाले पाहिजेत. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कट्टी लावून अक्षरश: लूट केली जात आहे, ती थांबली पाहिजे, असा सूर शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सीसीआय कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार छगन वाघ यांच्याकडे काल लेखी तक्रार केली.

अरुण गुजराथी म्हणाले, चोपड्यात शेतकऱ्यांची कापूस घेणारी एकच जिनिंग आहे, त्यात पारदर्शकता राहिली पाहिजे, जेथे शेतकऱ्यांच्या समस्या असतील तेथे वांदा कमिटीचा माध्यमातून न्याय निवाडा झाला पाहिजे.

चोसाकाचे माजी चेअरमन अॅड. घनश्याम पाटील यांनी रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले, कापसात कट्टी आली की ती वाढतच जाते, शेतकऱ्याच्या समंती शिवाय माल बळजबरीने घेऊ नका, सर्वांना एकच नियम असला पाहिजे, मी कोणाची एकाची बाजू घेणार नाही, मागच्या वर्षी सीसीआय केंद्रावर गंभीर तक्रारी होत्याच. वांदा कमिटी च्या माध्यमातून न्याय निवाडा करा, बाजार समितीचे उपसभापती हे वांदा कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली हे वाद सोडवले पाहिजे.

शेतकरी संघटनेचे चोपडा तालुकाध्यक्ष नितीन निकम म्हणाले की, या वर्षी शेतकरी राजा अगोदरच अनेक समस्यांनी खचला आहे, कट्टी न लावता कापूस खरेदी करा, गत वर्षी याच ठिकाणी हमाली व कट्टीमध्ये प्रचंड लूट शेतकऱ्यांची झाली होती, ती यावर्षी आम्ही होऊ देणार नाहीत, शेतकऱ्याच्या तक्रारी आल्या तर त्या समोपचाराने मिटवा.

अन्याय झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
या बैठकीत शेतकरी संघटनेचे संदीप पाटील म्हणाले, केंद्र सुरू राहिले पाहिजे, शेतकरी नाडला गेला नको पाहिजे, हे केंद्र शेतकऱ्यांसाठी आहे, ज्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल त्यांनी थेट आम्हाला संपर्क करावा असे आवाहन ही पाटील यांनी या वेळी केले. या वेळी सीसीआय केंद्राचे प्रमुख अधिकारी महेंद्रपालसिंग यादव म्हणाले, कट्टी हा आमचा विषय नाही.