चोपडा नगरपरिषदेत वृक्षरोपणात मोठा गैरव्‍यवहार ?

चोपडा


नगरसेविका संध्या महाजन यांची पत्रकार परिषदेत माहिती


चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> चोपडा नगपरिषद सन २०१९-२० या वर्षासाठी शहरातील हद्दीत वृक्षारोपण करण्‍यासाठी कंत्राट देणार होते. सदर कंत्राटानुसार नागरिकांच्‍या मागणीनुसार रोपे लावून देणे, ट्रिगार्ड पुरवीने. एका रोपासाठी ३६५/- व ट्रिगार्डसाठी ३५०/- असे दर नगरपरिषदेने मंजुर केलेले होते. सदरचे कंत्राट पाणी पुरवठा अभियंता, पाणीपुरवठा विभाग यांच्‍यामार्फत केले गेले होते.


परंतु दरवर्षी १० लाख खर्च होणा-या कामात सन २०१९-२० या वर्षात २१.५० लक्ष एवढा मोठा खर्च झाला आहे. त्‍याबाबतीत चोपडा नगरपरिषद नगरसेविका संध्‍या महाजन यांनी वृक्षारोपणा संबंधी माहिती मागीतली असता अनेक धक्‍कादायक बाबी उघडकीस आल्‍या असल्याचे त्यांनी सांगितले. मुळात १० लक्ष तरतुद सन २०१९-२० वर्षासाठी केलेली असताना ती २५ लाखांवर का वाढवण्‍यात आली ?

लेखापाल यांनी प्रत्‍येक बिलात वेगवेगळी तरतुद लिहिलेली दिसून येत आहे. तसेच वाटप केल्‍या गेल्‍याचा पुरावा माहितीत मागितला असता पाणीपुरवठा अभियंता हे १७४४ रोपे व १६४४ ट्रिगार्ड असे एकूण १२ लाखांच्‍या रोपांचे पुरावे देण्‍यात आलेले आहेत. उरलेल्‍या २०२७ रोपांचा कुठलेही रेकॉर्ड मागितलेल्या माहितीत पाणीपुरवठा अभिंयता यांनी दिलेले नाही.

नागरिकांच्‍या रोप मागणीच्‍या दाखल्‍यावरुन फक्‍त १७४४ रोपे व १६४४ ट्रिगार्ड अशी १२ लाखांची मागणी अ‍सताना पाणीपुरवठा अभियंता यांनी ३७०० रोंपे व २२८१ ट्रिगार्ड असे एकूण रु. २१.५१ लाखांची बिले कशी काढली गेली असा प्रश्‍न या कागदपत्रांवरुन संध्या महाजन यांनी उपस्थित केला आहे.


वन विभागाकडून ३२०० रोपे मोफत मिळाली व पावसाळ्यादरम्‍यान कंत्राटदाराकडून २३०० रोपे खरेदी करण्‍यात आलेले होते. अशाप्रकारे ५००० रोप लागवडीचे उद्दीष्‍ट साध्‍य झाले असतानाही पाणीपुरवठा अभियंता यांनी ३ अजुन पुरवठा आदेश दिले ज्‍यात १३१२ रोपांसाठी नगरपरिषदेचे सुमारे ४ लक्ष अनावश्‍यक खर्च झाला.

वनविभागाकडून मोफत मिळालेल्‍या रोपांचे रजिस्‍टरवर नागरिकांच्‍या सह्या झाल्‍यानंतर खाडाखोड करुन दिलेल्‍या रोपांची संख्‍या वाढवलेली आहे. त्‍यातही ४१४ रोपांच्‍या नोंदी कमी आहेत. ११२५ रोपे दिल्‍याबद्दल त्‍या नागरिकांच्‍या सह्याच नाहीत.


तसेच पावसाळा संपल्‍यानंतर ३ पुरवठा आदेश देणे, बीले व रोपे लावल्‍याचा पुराव्‍यातील संख्‍या व परिसरात मेळ नसणे, नागरिकांच्‍या रोपे देण्‍याच्‍या दाखल्‍यांवर तारिख नसणे, रोप मिळाल्‍याबाबत पोहोच नसणे, त्‍याचे रजिस्‍टर नसणे, पुरवठा आदेश टिप्‍पणी बॅक डेटेड बनविलेले असणे त्‍यांच्‍या तारखांमध्‍ये मेळ नसणे, एकही बीलास आवक नंबर नसणे, असा मोठ्या प्रमाणावर गैरव्‍यवहार सदर कागदपत्रांच्‍या आधारे उघड होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदर गैरव्‍यवहार पुरव्‍यानिशी सिध्‍द करणारा तक्रारी अर्ज सौ. संध्‍या महाजन यांनी चोपडा नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी यांच्‍याकडे केला आहे त्‍यास नगरसेवक डॉ. रविंद्र पाटील यांनी अनुमोदन दिले आहे.

या अर्जानुसार सन २०१९-२० च्‍या वृक्षरोपणात गैरव्‍यवहार करणा-यांवर कारवाई करण्‍याबाबत मागणीही केली आहे. सदर अर्जाची प्रत नगरविकास विभाग, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नाशिक आयुक्‍त कार्यालय यांना देखील देण्‍यात आला आहे. नगरविकास विभागाकडून सदर विषयात कारवाई करण्‍याबाबत मुख्‍याधिकारी यांना कळविण्‍यात आले आहे. नाशिक आयुक्‍त कार्यालय व जिल्‍हाधिकारी कार्यालयाने अद्याप दखल घेतलेली नाही.


यावर्षीच्‍या पावसाळ्यात रोपे मागण्‍यास जाणा-या नागरिकांना कोरोनाचा बहाणा करुन यावर्षी वृक्षारोपण करणार नसल्‍याचे पाणीपुरवठा अभियंता सांगण्‍यात येत आहे. तसेच यावर्षी नवीन कंत्राट देऊनही कंत्राटदाराकडून रोपे खरेदी न करता वनविभागाकडून कमी किमतीत रोपे खरेदी करण्‍यात येऊन मोजके रोपे वाटप करण्‍यात येत आहेत.

नगरसेविका सौ. संध्‍या महाजन यांच्‍या नुसत्‍या अर्जामुळे नगरपरिषदेचे यावर्षी किमान २० लाख वाचले याबाबत त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.


याबरोबरच दि. ०९ सप्‍टेंबर रोजी झालेल्‍या सर्वसाधारण सभेत त्रैमासिक बीलांची मंजुरीच्‍या विषयावर एक उपसुचना मांडली आहे. त्‍यास नगरसेविका संध्‍या महाजन सूचक असून गटनेता शिवसेना नगरसेवक महेश पवार व डॉ. रविंद्र पाटील अनुमोदक आहेत. सदर उपसुचनेत पाणी पुरवठा विभागात मागील वर्षात पाईपलाईन रिपेअरिग, ट्युबवेल दुरुस्‍ती, रसायने खरेदी, पाणीपुरवठा देखभाल खर्च, वृक्षारोपण व देखभाल या हेड अंतर्गत सन २०१८-१९ मध्‍ये सुमारे ७५.५५ लाख खर्च झाला आहे. पण सन २०१९-२० मध्‍ये मात्र हा खर्च याच हेड अंतर्गत १ कोटी ४४ लाख इतका प्रचंड झाला आहे. हा सगळा खर्च न.प. फंडातून केला जातो.

जो गोरगरीब जनतेच्‍या करातून वसुल केला जातो. सदर खर्च अचानक या वर्षी दुपटीने वाढण्‍याचे कारण काय ? असा प्रश्‍न या उपसुचनेत मांडला असून या बीलांची चौकशी करावी असे या उपसूचनेत म्‍हटले आहे. वृक्षारोपणाच्‍याच ६ बीलांमध्‍ये एवढा गैरव्‍यवहार दिसून येतो तर ही १ कोटी ४४ लाखाची बीले कशी दिली गेली असतील हा प्रश्‍नच आहे.


नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी अविनाश गांगोडे एक शिस्‍तप्रिय अधिकारी आहेत. त्‍यांच्‍या कार्यभारांतर्गत अशा नवनियुक्‍त अधिका-यांची फळी तयार होत असणे, दुदैवाची बाब आहे. आता सदर तक्रार अर्ज मिळालेल्‍या माहितीतील पुराव्‍यानिशी मुख्‍याधिकारींना दिलेला आहे.

आता मुख्‍याधिकारी सदर पाणी पुरवठा अभियंतांवर कारवाई करतात कि त्‍यांच्‍या गैरव्‍यवहारांवर पांघरुण घालून त्‍यांना वाचविण्‍याचा प्रयत्‍न करतात, हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.तसेच सदर प्रकारणाची त्रयस्थ समिती द्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी संध्या महाजन यांनी केली आहे.


पत्रकार परिषदेतस शिवसेना शहर प्रमुख आबा देशमुख, नगरसेवक महेश पवार, नगरसेवक राजाराम पाटील, नरेश महाजन ( शहर प्रमुख शिवसेना) नगरसेविका लताताई पाटील, नगरसेविका मीनाताई शिरसाठ इत्यादी उपस्थित होते….

2 thoughts on “चोपडा नगरपरिषदेत वृक्षरोपणात मोठा गैरव्‍यवहार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *