चोपड्यात दोन गावठी कट्ट्यासह ३ जण अटकेत ; ५६ हजारांचा माल जप्त

क्राईम चोपडा पाेलिस

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील >> जळगाव एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व चोपडा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी २८ रोजी मध्य प्रदेशातून येऊन चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन गावठी पिस्तूल (कट्टे), ६ जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या तिघांना पकडले आहे. त्यांच्याकडून ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

उमर्टी (ता.वरला) येथून २८ रोजी गावठी पिस्तूल खरेदी करून चोपडा शहरातून काही संशयित जाणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहरातील सुंदरगढी भागात कोपऱ्यावरील सार्वजनिक शौचालयाजवळ दुपारी ३ वाजेच्या सुमारास सापळा रचला.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील चिंचोल येथील आकाश माधव सानप (वय २४), सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगाळा येथील महेश निवृत्त सानप (वय २४) हे तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून २५ हजार किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तुल व ४ हजार रुपये किमतीचे ४ जिवंत काडतूसे असा २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

दोघे दुचाकीवरून प्रवास करत होते. तर दुसऱ्या पथकाने २८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चोपडा ते चुंचाळे रोडवरील स्मशानभूमीजवळ दुचाकीने (एमएच.१९-डीएच- ४०५४) जाणाऱ्या शहरातील अरुण नगरमधील मयूर काशीनाथ वाकडे (वय २२) याची झडती घेतली असता २५ हजारांचा गावठी कट्टा व २ हजारांचे २ जिवंत काडतूस सापडले. या तिघांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कट्टे विक्री करण्याच्या उद्देशाने दोघांनी ते जवळ बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले.