चंपाषष्ठीदिनी होणारा सावद्यातील खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द

Social कट्टा कट्टा फैजपूर रावेर सावदा


सावदा ता. रावेर प्रतिनिधी >> येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीला होणारी खंडेराव महाराजांची यात्रा या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. येथील जागृत देवस्थान खंडेराव महाराज मंदिर परिसरात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरते. मात्र यंदा कोरोना महामारीचे संकट व आरोग्याच्या दृष्टीने येत्या २० डिसेंबर रोजी भरणारी यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे भगत देवस्थान संस्थानचे प्रमुख अशोक पवार (भगत) व राहुल पवार यांनी सोमवारी बैठकीत जाहीर केले.

ही यात्रा रद्द करण्यात आल्याने खेळणी, पाळणे व हॉटेल व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारचे दुकाने यात्रेच्या दिवशी लावू नये, असे आवाहनही उभयतांनी केले आहे. मात्र मंदिर भाविक, भक्त यांच्याकरिता दर्शनासाठी खुले राहणार आहे. तसेच पारंपरिक सकाळ आरती, तळी भरणे, पूजा इतर कार्यक्रम मंदिरात भगत व पुजारी यांच्यामार्फत कमी लोकांच्या उपस्थितीत नियम पाळून पूर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शनास येताना मास्क लावून व सॅनिटायझर वापरून व सुरक्षित अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) ठेवून यावे, असे आवाहन केले आहे.