लग्नाचे आमिष दाखवून तरुणास दीड लाखात गंडवले

क्राईम चाळीसगाव चोरी, लंपास

चाळीसगाव प्रतिनिधी >> वडाळा वडाळी येथील ३२ वर्षीय तरुणाशी एका तरुणीचे लग्न एका टोळीने ठरवले. त्यापोटी नियोजित वराने या टोळीस दीड लाख रूपये दिले. घरात लग्नाची तयारी सुरू असताना व बस्त्यासाठी वराचे कुटुंबीय व नियोजित वधू चाळीसगावी आली असताना वधूसह तिच्या साथीदारांनी पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरुणी व त्या टोळीविरूद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील वडाळे येथील अंकुश भाऊसाहेब आमले (वय ३२) हा तरूण आई व भावासह शेती व्यवसाय करतो. अंकुशचे लग्नाचे वय झाल्याने आई व इतर नातेवाईक त्याच्यासाठी मुलगी शोधत होते. दरम्यान, औरंगाबाद येथील संगीता बाबुराव पाटील ही महिला एजंटचे काम करते, असे त्यांना समजले. तर संगीता ही ५ डिसेंबरला ओझर येथे आपल्या मुलीस भेटण्यास आली होती. तेथे अंकुश आमले व त्याचे मावसे हे संगीताला भेटले. ‘मी तुम्हाला लग्नासाठी एखाद्या गरीब घरातील मुलगी शोधून देते, पण त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल, असे तिने सांगितले. तर दोन दिवसात पैसे देतो अशी अंकुशने ग्वाही दिली. त्यानंतर अंकुश नातेवाइकांसह ओझरला आला. तेथे संगीताने ममता नावाच्या एका मुलीशी ओळख करून दिली. त्यांच्याबरोबर रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील अशोक कडू चौधरी व बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील संदेश राजेश वाडे, अकील मामा, रेखाबाई यांच्यासह अन्य इतर ३ ते ४ जण होते.

अंकुशला मुलगी पसंत पडल्याने लग्नासाठी त्याने होकार दिला. मुलीकडील मंडळींनी दोन दिवसात लग्न लावून देवू असे म्हणत लग्नाच्या तयारीसाठी दीड लाख रूपये लागतील, असे सांगितले. हे दीड लाख संगीता जवळ दिले. संगीताने पैसे घेतल्यानंतर ती व तिच्या सोबतची एक महिला व अन्य लोक वाहनाने निघून गेले. दुसऱ्या दिवशी बस्ता असल्याने लग्नासाठी आलेली ममता ही मुलगी अंकुशचा मावसे यांच्याकडे ओझर येथे मुक्कामी होती. तर अंकुश व त्याचे कुटुंब लग्नाच्या तयारीसाठी घरी परतले.

यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी संगीता पाटील, अशोक चौधरी, संदेश राजेश वाडे, अकील खान, रेखाबाई (चिखली) स अन्य अनोळखी २ ते ३ जणांविरुद्ध फसवणुकीचा चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश व त्याचे नातेवाईक आणि ममता हे सर्व १२ डिसेंबरला दुपारी १ वाजता बस्त्यासाठी चाळीसगावात आले. नियोजीत वधूचे कापड दुकानातून कपडे घेतले. त्यानंतर तिच्यासाठी दागिने घ्यावयाचे असल्याने अंकुशची आई, बहिण आणि ममता असे सराफाकडे जात असताना ममता एका व्यक्तीबरोबर वाहनात बसून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती अंकुशच्या बहिणीने दिली. त्यानंतर अंकुशसह इतर नातेवाइकांनी जुन्या पालिकेजवळ आले. त्यांनी तरुणी आणि तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीची विचारपूस केली असता या तरुणीने खरे नाव रेशमा रफिक खान (रा. शहानगर, बीड बायपास, औरंगाबाद) व तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीचे नाव अशोक कडू चौधरी (रा. कुंभारखेडा, ता. रावेर) असे सांगितले. त्यावेळी तरुणीकडे दिलेले दीड लाख रूपये मागितले असता तीने हे पैसे संगीताबाई घेऊन गेल्याचे सांगितले. तसेच त्या मुलीने अंकुशशी लग्नास नकार देत घराचा रस्ता धरला.