चाळीसगावात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी 15 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा

क्राईम चाळीसगाव पाेलिस

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे ::> विना परवाना वाळू वाहतुक करणारा ट्रक महसूल विभागाच्या पथकाने पकडला. धुळे रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चाळीसगाव मंडळ अधिकारी शैलेंद्र परदेशी व शहर तलाठी विनोद कृष्णाराव मेन हे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याकरिता गस्त घालत होते. तेव्हा चाळीसगाव-धुळे रस्त्यावर पुन्शी पेट्रोलपंपाजवळ पिवळ्या रंगाचा (क्र. एम.एच. ४१ ए.यू.१८९९) ट्रक उभा असलेला दिसला.

त्याबाबत संशय आल्याने पथकाने ट्रकच्या अात डोकावून पाहिले असता त्यात वाळू भरलेली दिसली. पथकाने ट्रकचालक सुनील मारुती डांगे, रा. भुतवाडे, ता. मालेगाव याच्याकडे गौण खनिज व वाळू वाहतुक करण्याबाबत परवाना मागितला असता तो नसल्याचे सांगितले.

हा ट्रक किरण राजपूत, रा. चाळीसगाव याच्या मालकीचा असल्याची माहिती त्याने पथकाला दिली. अवैध वाळू वाहतुक हाेत असल्याचे आढळल्याने पथकाने पंचासमक्ष पंचनामा करून ट्रकसह ७ ब्रास वाळू असा १५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

या प्रकरणी चाळीसगाव शहर तलाठी विनोद मेन यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत दोघांविरोधात भादंवि कलम ३७९, १०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने धडक कारवाई करत पोलिसांत गुन्हा दाखल केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले असून सामान्यांकडून मात्र कारवाईचे स्वागत होत आहे.