शासकीय मका व ज्वारी खरेदी केंद्राचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते शुभारंभ…

Politicalकट्टा चाळीसगाव

केंद्र शासनाच्या हमीभावाने शेतकऱ्यांना तारले…

चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या शेतकऱ्याचा शेवटचा धान्याचा दाणा खरेदी होईपर्यंत खरेदी सुरू ठेवण्याच्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या सूचना

चाळीसगाव – आधी अतिवृष्टी व नंतर कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाने मका व ज्वारी खरेदी करण्यात यावी अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत होती आज अखेर मार्केटिंग फेडरेशन व तालुका शेतकी संघाच्या वतीने शासकीय हमीभावाने मका व ज्वारी खरेदीची सुरुवात चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आली.

करगाव गणपती मंदिर परिसरातील शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन गोदामात ही खरेदी सुरू झाली असून यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, शेतकी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, नगराध्यक्ष पती विश्वास चव्हाण, पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, सीए भूषण भोसले, कैलास पाटील,भाऊसाहेब पाटील, जालम पाटील, सतीश महाजन, अजय आव्हाड, विकास शिसोदे, संजय साळुंखे, के.डी. वाघ यांच्यासह शेतकी संघाचे संचालक मंडळ व शेतकरी वर्ग उपस्थित होता.


यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका व ज्वारी ची पेरणी केली होती, त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते मात्र कोरोनाच्या संकटामुळे बहुसंख्य अन्नप्रक्रिया उद्योग बंद पडल्याने शेतकऱ्यांना मका व ज्वारीची विक्री मातीमोल दराने करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मक्याला १७६० क्विंटल व ज्वारीला २५५० रु प्रति क्विंटल या जाहीर केलेल्या हमीभावाने शासनाने खरेदी करावी यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन च्या वतीने शेतकी संघामार्फत ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती.
त्यात चाळीसगाव तालुक्यातील जवळपास ७०० मका व ३०० ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यात मका हेक्टरी ५४ क्विंटल व ज्वारी हेक्टरी १९.५० क्विंटल या मर्यादेत खरेदी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल के. साळुंखे यांनी दिली.

चाळीसगाव तालुक्यातील नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मका व ज्वारीचा शेवटचा दाणा खरेदी झाला पाहिजे यादृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, खरेदीसाठी आवश्यक असणारे बारदाने – पोते तहसीलदार यांनी तात्काळ उपलब्ध करून द्यावेत अश्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्या.


३० जूनपर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी आपला मका किंवा ज्वारी पिकपेरा असलेला सात बारा, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स घेऊन शेतकी संघात नोंदणी करावी व केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *