चाळीसगावच्या नगराध्यक्षांना बडतर्फ करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

चाळीसगाव

शहर विकास अाघाडीसह अपक्ष नगरसेवकांनी सादर केले निवेदन

चाळीसगाव ::> पालिकेतील भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता चव्हाण या पालिका व शहरवासियांप्रती असलेली जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरल्या असून त्यांना नगराध्यक्ष पदावरून हटवावे, अशी मागणी शहर विकास आघाडीसह अपक्ष नगरसेविकांनी केली आहे. मंगळवारी त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले. निवेदनावर जवळपास २० नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील चार वर्षाच्या काळात अधिक वेळा पत्रव्यवहार, तोंडी चर्चा, सूचना अशा अनेक संधी देवूनही नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झालेली नाही. चार ते पाच महिने पालिकेची मासिक सभा होत नाही. झाली तरी आठ महिने प्रोसिडिंग लिहिले जात नाही. चुकीचे ठराव लिहिले जातात. तसेच पालिकेच्या कामकाजात बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप होतो.

ठराविक नगरसेवकांच्या वार्डातच कामे केली जात असून मर्जीच्या ठेकेदारांनाच कामे दिली जातात. नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. शहराची जी परिस्थिती झाली त्याला सर्वस्वी नगराध्यक्षा आशालता चव्हाण जबाबदार असून त्या आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरत असल्याने महाराष्ट्र नगरपरिषद, नगर-पंचायती १९६९च्या नियमांच्या आधारे त्यांना आपल्या पदावरून हटवण्यात (बडतर्फ) करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री, नगरविकास विभागाकडेही करणार तक्रार
निवेदनावर उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, नगरसेवक सुरेश स्वार, आनंदा कोळी, मनीषा देशमुख, शेखर देशमुख, यास्मिनबी बेग, अपक्ष नगरसेविका सायली जाधव, वंदना चौधरी, गीताबाई पाटील, शंकर पोळ, संगीता गवळी, योगिनी ब्राम्हणकार, दीपक पाटील, रंजना सोनवणे, रामचंद्र जाधव, रवींद्र चौधरी, अलका गवळी, सविता राजपूत, सूर्यकांत ठाकूर, सुरेश चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभागाकडेही तक्रार करून न्याय मागणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व आघाडीचे नगरसेवक शाम देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *