विहरीत आढळला बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह

आत्महत्या क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी >> गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह हा उंबरखेड शिवारातील पाणी पुरवठा करणार्‍या विहरीत आढळून आला आहे.

तुकाराम धर्मा महाले (वय- ४६ रा. उंबरखेड) ता. चाळीसगाव आपल्या पत्नी व मुलांबरोबर येथे वास्तव्यास होता. तुकाराम महाले हा लहानपणापासून मनोरूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू होता. तो आपला मामा रमेश बागूल (रा. वरखेडे) यांच्या सलूनच्या दुकानात कामाला जात असे.

दि. २ मार्च रोजी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास तुकाराम महाले हा कामासाठी वरखेडे येथे गेले असता घरी परतलाच नाही. शोधाशोध केली असता मिळून आला नाही. म्हणून चुलत भाऊ रोहित महाले यांनी मेहूणबारे पोलिस ठाण्यात हरवल्याची फिर्याद ५ मार्च रोजी दाखल केली होती. दरम्यान तालुक्यातील उंबरखेड शिवारातील देवळी येथील पाणीपुरवठा करणार्‍या विहीरीत काल एका इसमाचा मृतदेह असल्याचे दिसून आले. परिसरात एकच खळबळ उडाली.

याच विहीरीतून गावाला पाणीपुरवठा होत असल्याने गावकर्‍यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत कुणाल राजेंद्र महाले यांनी मेहूणबारे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.