चाळीसगावातील १०० घरांसमोरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात हटवले

चाळीसगाव पाेलिस

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> शहरातील कुरैशी नगर भागातील अतिक्रमणावर बुधवारी पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. तब्बल १०० घरांबाहेर झालेले अतिक्रमण जेसीबीने हटवण्यात आले. पोलिस बंदोबस्तांत पालिकेने ही कारवाई केली.

शहरातील छोटी गुजरी जवळील कुरेशी गल्लीतील बहुतांश रहिवाशांनी पालिकेच्या गटारीवरच १० ते १५ फुट अतिक्रमण केले होते. कुणी जिना तर कुणी संडास, बाथरूमचे बांधकाम केले. या अनधिकृत बांधकामामुळे या भागातील गटारी स्वच्छ करणे कठीण झाले होते.

गटारी तुंबल्याने सांडपाणी पसरून परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरत होती. प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे त्यांनी पालिकेत दोन वेळी धडक देवून प्रशासनाकडे गाऱ्हाणे मांडले होते.

दखल न घेतल्याने हातोडा >> गटारींवर झालेले अतिक्रमण काढावे अशी मागणी रहिवाशांनी केली होती. त्यानुसार पालिकेने काही दिवसांपूर्वी संबंधितांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या. मात्र त्यानंतरही रहिवाशांनी नोटिशांची दखल न घेतल्याने शेवटी पालिकेने बुधवारी अतिक्रमणांवर हातोडा चालवला.

पोलिस बंदोबस्तांत कारवाई >> नगर अभियंता विजय पाटील, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रेमसिंग राजपूत यांनी ही कारवाई केली. अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी व ट्रॅक्टरचा वापर केला. पालिकेचे २० कर्मचारी तसेच शहर पोलिस ठाण्याचे १ अधिकारी, ५ पुरुष व १ महिला पोलिस असा बंदोबस्त होता. सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेली कारवाई दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू हाेती. तर उर्वरीत चार गल्ल्यांमधील अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्यास तेथील रहिवाशांना सोमवारपर्यंत मुदत पालिकेने दिली आहे.