यावल तालुक्यातील तरुणाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या क्राईम यावल

यावल प्रतिनिधी >>तालुक्यातील बोरावल येथे तरुणाने शेत शिवारात निंबाच्या झाडावर गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. संजय अशोक सपकाळे (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.

बोरावल शेत शिवारातील नीलेश निवृत्ती शंकोपाळ यांच्या शेतात गुरुवारी सकाळी ८ वाजता मजूर कामास गेले. तेव्हा त्यांना शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेवून मृतावस्थेत संजय अशोक सपकाळे, रा. बोरावल हा आढळला.

या बाबत येथील पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला. येथे डॉ.बी.बी. बारेला यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.

या प्रकरणी यावल पोलिसांत भास्कर रमेश कोळी यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजय सपकाळे यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. पुढील तपास हवालदार अशोक जवरे करत आहे.