बोदवड प्रतिनिधी >> बोदवड तहसील कार्यालयात महिलेच्या नावावर शेती करुन देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणारे येथील तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी या तिघांना एसीबीच्या पथकाने दोन लाख रुपयांच्या लाच प्रकरणी ताब्यात घेतल्याने खडबड उडाली आहे.
बोदवड शहरातील तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारच्या वेळी तहसीलदार हेमंत पाटील, तलाठी निरज पाटील व मंडलाधिकारी संजय शिरसाठ अशी एसीबी पथकाने ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे असून या घटनेतील तक्रारदाराने सन 2002 मधे त्याच्या पत्नीच्या नावे शेती विकत घेतली होती. काही वर्षांनी ती शेती पुन्हा मुळ मालकाच्या नावावर झाल्याची चुक तक्रारदाराने मंडळ अधिका-यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे ती शेती पुन्हा तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे करण्यात आली. मात्र तहसीलदारांनी आक्षेप घेत नोटीस काढून कागदपत्रात त्रुटी असल्याचे म्हटले. ही शेती सरकारजमा होईल अशी भिती तक्रारदाराच्या मनात घालण्यात आली.
दरम्यान सर्कल व तलाठी यांच्यामार्फत नोटीस रद्द करुन शेती नावावर करुन देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच तक्रारदारास मागण्यात आली. अखेर तडजोडीअंती दोन लाख रुपये तक्रारदाराने देण्याची तयारी दर्शवली. मात्र तक्रारदारास दोन लाख रुपयांची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार केली असता एसीबीच्या पडताळणीत तहसीलदारांनी मंडलाधिकारी व तलाठी या दोघांमार्फत लाचेची केलेली मागणी स्पष्ट झाली. त्यानुसार रचलेल्या सापळ्यात मंडळ अधिका-यांनी लाच घेताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान तहसीलदारांच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली. ही कामगिरी जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.