बोदवडात दिव्यांग महिलेवर अत्याचार

आंदोलन क्राईम जळगाव जळगाव जिल्हा निषेध पाेलिस बोदवड

बोदवड >> येथील महिलेच्या विकलांगपणाचा गैरफायदा घेत, तिला लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले. यातून ती महिला गरोदर राहिली. तिला व तिच्या दोन मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदवण्याची मागणी राष्ट्रीय विकलांग पार्टीने निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला.

सदर महिला अशिक्षित असून ती येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली असता ठाणे अंमलदाराने साधा दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून तिला ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

तेथून तिला महिला पोलिसांनी नेणे गरजेचे असताना तसे न करता दोन पुरुष पोलिसांनी तिला जळगाव येथील शासकीय आशादीप वसतिगृहात पाठवले आहे.

या प्रकरणी तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासनाने यात आरोपीस पाठीशी घालून कारवाईस टाळाटाळ केल्याचे दिसते, असा आरोप संघटनेने केले.

या प्रकरणाची चौकशी करून आरोपीस अटक करावी. तसेच त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवून महिलेस न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे.

या वेळी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष धनराज गायकवाड, तृतीयपंथी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष अंजली पाटील, जिल्हाध्यक्ष पी.एम.पाटील, सचिव रोशन शाह, किशोर गायकर व दिव्यांग बांधव उपस्थित होते.