बोदवडच्या माजी बीडीओंची विभागीय आयुक्तांकडून झाडाझडती

Politicalकट्टा कट्टा क्राईम बोदवड सिटी न्यूज

बोदवड प्रतिनिधी >> येथे मागील दोन वर्षांपासून सेवा बजावलेले व सध्या भडगाव पंचायत समितीत कार्यरत असलेले गट विकास अधिकारी रमेश ओंकार वाघ यांच्या कार्यकाळात तालुक्यात भ्रष्टाचाराने व अनियमित कामकाजाने जनता हैराण झाली होती.

या प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत गुरुवारी नाशिक विभागीय आयुक्तांच्या पथकाने बोदवड पंचायत समितीत गटविकास अधिकारी वाघ यांना बोलवून दिवसभर चौकशी केली.

वाघ यांच्या कार्यकाळातील विविध कागदपत्रे व फायली यांची चौकशी केली. तसेच रमाई घरकुल योजना, कोल्हाडी व बोरगाव येथील १४ व्या वित्त आयोगातील ग्रामनिधी, कोल्हाडी, बोरगाव, सुरवाडे, मुक्तळ, चिखली व लोणवाडी येथील शाळांच्या संरक्षण भिंती व स्वच्छ भारत अभियान, दलित वस्ती सुधार योजनेतील गैरव्यवहार, सार्वजनिक भूखंडाची परस्पर विक्री यासारख्या विविध प्रकरणांची पथकाने सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सखोल चौकशी केली.

या पथकात धुळे जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी बी.एम. मोहन, धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोतकर, जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्यासह चार अधिकारी व कर्मचारी पथकात होते. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितावर काय कारवाई होते, याकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे.