बोदवड >> बोदवड नगरपंचायतीच्या सर्व १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने चार जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली होती.

आता हे प्रभाग अनारक्षित करून १८ जानेवारीला या चार जागांसाठी मतदान होईल. त्यासाठी सोमवार, ३ जानेवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. तर आतापर्यंत एकूण १० इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबरच्या आदेशानुसार बोदवड नगर पंचायतीमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित चार जागा अनारक्षित करण्यात आल्या आहेत.

त्यासाठी चार प्रभागांचे निवडणूक आरक्षण २३ डिसेंबरला जाहीर झाले होते. त्यात प्रभाग क्र.२ मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ३ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र.१५ सर्वसाधारण व प्रभाग क्र.१७ मध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले होते.

यानंतर सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेत २९ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, १ जानेवारीला शनिवार, तर २ जानेवारीला रविवारची सुटी असल्याने इच्छुकांना ३ रोजीची संधी आहे.

दरम्यान, २९ डिसेंबरला प्रभाग १५ मधून २, तर ३१ डिसेंबरला प्रभाग २ मध्ये ४, प्रभाग ३ मध्ये २ आणि प्रभाग १७ मध्ये २ असे सर्व मिळून १० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

सोमवारी शेवटच्या दिवसानंतर ४ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी, वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी होईल. यानंतर १८ जानेवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.

तद्नंतर १९ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *