प्रतिनिधी बोदवड >> कामासाठी मुकादमाने डांबून ठेवलेल्या ६ ऊसतोड मजूर व त्यांच्या ७ अल्पवयीन बालकांची पोलिसांनी ३० डिसेंबर रोजी सुरक्षितरित्या सुटका केली. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली हे विशेष.

अॅड. जितेंद्र विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात काही ऊसतोड मुकादम बोदवड तालुक्यातील काही ऊसतोड कामगारांना पैशांचे प्रलोभन दाखवून आपल्या सोबत घेऊन गेले होते. अशिक्षित व अत्यंत गरिबीने त्रस्त मजूर थोड्याफार पैश्याच्या आशेने ह्या मुकादमांवर विश्वास ठेऊन आपली घरदार सोडून कर्नाटकातील नंदी साखर कारखान्यानजीक गेले होते. त्यातील एक कुटुंब पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका वीट भट्टीवर डांबून ठेवण्यात आले होते.

मजुरांनी पळून जाऊ नये म्हणून अंधाऱ्या खोल्यामंध्ये बंद केले होते तर काहींना दोरखंडाने बांधून ठेवले होते. काम न करणाऱ्यांना उपाशी ठेवले जात होते. या परिवारात काही अल्पवयीन बालके होती. या पीडितांनी बोदवड तालुक्यातील मूळ गावी आपल्या नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यांनी बोदवड पोलिस स्टेशनला तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र कुणी दखल घेतली नाही.

त्यानंतर सामाजिक संघटनांनी उपोषण केले. नातेवाईकांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतरही हालचाल न झाल्याने नातेवाईकांनी सरळ न्यायालयात याचिका दाखल करण्याचे ठरवले. अॅड. जितेंद्र विजय पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करुन मजुरांची सुटका करावी व मुकादमाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

या याचिकेवर २२ रोजी न्या. व्ही. के. जाधव व एस. सी. मोरे यांच्या पीठाने पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना नोटीस काढून ५ जानेवारीपर्यंत आपले म्हणणे सदर करण्यास सांगितले. त्याची दखल जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतली व बंदिस्त मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु केले. ३० डिसेंबर रोजी सर्व बंदिस्त परिवारांची सुटका करून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. परिवारातील सदस्यांची सुटका झाल्याने निश्वास सोडला.

नवजात बालिकेचाही होता समावेश
मुकादमाच्या सुटका होऊन आलेल्या मजुरांमध्ये सहा वयस्क महिला व पुरुष मजूर असून सात अल्पवयीन बालके आहेत. त्यात एक चार महिन्याच्या नवजात बालिकेचा देखील समावेश आहे. सुटका झाल्याने दिलासा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *