१३ वर्षीय अल्पवयीन मुलीला मैत्रीतून अपहरण करणाऱ्या दोघांना इंदोर येथून अटक

क्राईम बोदवड

बोदवड >> बोदवड तालुक्यातील कोल्हाडीच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला इंदूर (मध्य प्रदेश) येथे पळवून नेणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बुधवारी सकाळी ९.३० वाजता ताब्यात घेतले. त्यांनी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुलीचे अपहरण केले होते.

प्रकाश रतन बावस्कर (वय २२) व गणेश सुनील राणे (वय १९, दोघे रा. कोल्हाडी, ता. बोदवड) असे अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांनी गावातच राहणाऱ्या पूजा (नाव बदललेले) या १३ वर्षीय तरुणीचे अपहरण केले होते.

घटना अशी की, पूजा, प्रकाश व गणेश हे तिघे एकाच गावात राहणारे व परिचित होते. यातील पूजा व प्रकाश या दोघांची काही दिवसांपासून मैत्रीदेखील झालेली होती. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी कोल्हाडी शिवारातील प्रमोद ढाके यांच्या शेतात प्रकाश व पूजा यांची भेट झाली. यानंतर काही वेळातच प्रकाशने स्वत:ची दुचाकी आणून याच दुचाकीवरून त्याने पूजाला पळवून नेले.

या वेळी त्यांच्या सोबत गणेशदेखील आला. गणेशने बोदवड शहराच्या बाहेर एका पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरले. या वेळी कोल्हाडी गावातील काही लोकांनी तिघांना पाहिले होते. यानंतर याच दुचाकीने ते रात्रभरातून थेट इंदूर (मध्य प्रदेश) येथे निघून गेले. प्रकाशचे नातेवाईक सुशीला नारायण भुसारे यांच्या घरी तिघे थांबले होते. तर इकडे कोल्हाडी गावात पूजाच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. ती मिळून न आल्याने बोदवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

इंदूर येथून तिघांना ताब्यात घेतले : पूजा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास सोपवला. दोन पथक तयार केली. एक पथक प्रकाशचा एक मित्र दौंड (ता. अहमदनगर) येथे असल्याने तो तिकडे पळून जाण्याची शक्यता होती. त्यानुसार एक पथक दौंडला रवाना झाले. तर पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, राजेंद्र पाटील, कमलाकर बागुल, दीपक पाटील, विजय पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, अनिल देशमुख यांच्या पथकाने गणेश राणे याचे लोकेशन ट्रेस केले. त्यानुसार या पथकाने इंदूर गाठून प्रकाशसह तिघांना ताब्यात घेतले.