जळगाव‘जिल्ह्यातील नदीपात्रांतून अवैध वाळू उपसा हा माझ्याच काळात निर्माण झालेला नाही. वाळूमाफियांमध्ये शिवसेनेचे लोक नाहीत असेही म्हणणार नाही. स्पष्टचं सांगायचं झालं तर या व्यवसायात सर्व जाती, धर्मांचे व सर्वच राजकीय पक्षांचे लोक आहेत.

गतकाळात जे वाळूमाफिया होते त्यात चेतन शर्मा हे नाव जर आठवत असेल तर ते कोणत्या पक्षाचे हे खासदारांनी लक्षात घ्यावे’, असे स्पष्ट मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे व्यक्त करून खळबळ उडवून दिली.

खासदार उन्मेष पाटील यांनी गिरणा परिक्रमा केली. पालकमंत्री राष्ट्रीय महामार्गावरून जातात. त्यांना नदीपात्रातील अवैध वाळू उपसा करणारी वाहने दिसत नाहीत का? चुकीच्या बाबींना खतपाणी घालणाऱ्या राज्यकर्त्यांचा बुरखा फाडू, असा आरोप खासदार पाटील यांनी केला होता. त्याला पालकमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.

खासदारांना गुलाबराव पाटील नावाचा एक रोग झालेला आहे. म्हणून ते माझ्या नावाचा जप करताहेत. नादी लागू नका, असे त्यांना मागेही सांगितले. नारायण राणे सारख्यांना मी खपवतो. हे तर चिल्लर बाब, अशी टीका पालकमंत्र्यांनी खासदारांवर केली.

परिक्रमेचा अर्थ शिकायचा असेल तर नदीच्या काठावर फिरावे लागते. ते गाड्यांमध्ये फिरले. ज्या रस्त्यांवरून फिरले ते शेतरस्ते गुलाबराव पाटील तयार करीत आहेत. त्याच रस्त्यांवरुन त्यांना जावे लागले. ज्या मठापासून त्यांनी परिक्रमेला सुरुवात केली तेथे ८० लाख रुपये खर्चून सभागृह मी बांधले.

सात वर्षांपासून बलून बंधारे डोक्यावर घेऊन फिरत आहेत. २७ वर्षांपासून भाजपचा खासदार जळगाव लोकसभा मतदारसंघात आहे. त्यांची तिथे बोंब पडत नाही. त्यांच्याकडून काहीच कामे होत नाहीत.

लोकांना खासदार निधी देत नाहीत. शेतरस्ता देऊ शकत नाही. काही तरी स्टंट करण्यासाठी त्यांनी परिक्रमा केली. त्यांना दुसरे कोणतेच उद्दिष्ट नाही. म्हणून माझ्या नावाचा जप करीत असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *