मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे हे पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना मात्र ते आज भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाल्याने पुन्हा नव्याने सूत्र बदलले असल्याची चर्चा सुरु आहे.
एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपावर व देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजीचा सूर काढत आहेत. एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. यामुळे ते पक्षाला सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मागील आठवड्यात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासाठी स्वतंत्र बैठक घेतल्याची माहिती देखील राजकीय वर्तुळात सुरु असल्याचे बोलले जात आहे. तर काल सोशल मीडियात व्हायरल झालेल्या क्लिपमधून खडसे यांनी पक्ष बदलण्याचा विचार आपल्या एका कार्यकर्त्याशी बोलतांना व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज खडसे हे प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.