भाजपचे उपमहापौर खडकेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा सिटी न्यूज

जळगाव >> भाजप सोडून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसेंची भाजपचे उपमहापौर सुनील खडके यांनी शुक्रवारी दुपारी भेट घेतली. धावत्या भेटीत काही मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. खडसेंचे कट्टर समर्थक अशी ओळख असल्याने दोघांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, उपमहापौर खडके यांनी ही भेट औपचारीक होती. त्यात कुठलाही राजकीय उद्देश नव्हता, असे स्पष्ट केले आहे. परंतु, असे असले तरी स्थानिक पातळीवरील राजकीय प्रस्थापितांचे डोळे वटारले आहेत.

महानगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री खडसेंनी जळगावात काही ठराविक उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या त्यात सुनील खडकेंचा खडसेंनी प्रचार केला होता. त्यामुळे खडसेंच्या गोटातील असल्याचा शिक्का खडकेंवर आहे.

खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडकेंची उपमहापौरपदी निवड करण्यात आली होती. दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर खडसे व खडकेंची ही पहिलीच भेट असल्याचे सांगण्यात येते आहे.

खडसे बाहेर गावी निघत असल्याने अवघ्या काही मिनिटांच्या भेटीत काय चर्चा झाली हे उघड झाले नाही. परंतु खडसे यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यांची प्रकृती खराब होती त्या काळात भेट न झाल्याने आता भेटीसाठी गेल्याचे उपमहापौर खडकेंनी सांगीतले.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून उपमहापौर यांनी वॉर्डनिहाय दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे या भेटीला नवा अर्थ आहे.