भुसावळात महिलेसह पाच जणांची अत्याचारप्रकरणी चौकशी

क्राईम निषेध पाेलिस भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी >> मध्य प्रदेशातील खरगोन येथील ३५ वर्षीय महिलेवर भुसावळात सोमवारी (दि.२२) रात्री एका तरुणाने अत्याचार केले होते. या आरोपीच्या तपासासाठी तीन पोलिस पथके सक्रिय आहेत. गुरुवारी एका महिलेसह पाच संशयितांची चौकशी करण्यात आली.

खरगोन येथील ३५ वर्षीय महिला भुसावळात आली होती. एका अनोळखी तरुणाने तिला दुचाकीवरून ट्रामा केअर सेंटर मागील निर्जन स्थळी नेत अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० ते ११ वाजेदरम्यान घडली होती. अत्याचारानंतर महिलेच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न देखील तरुणाने केला होता. मात्र, महिलेने हा दगड चुकवल्याने तिचे प्राण वाचले. या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी, संशयित तरुणाने महिलेला ज्या मार्गावरून निर्जन स्थळी नेले, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. त्या आधारे तीन पथकांतर्फे आरोपीचा शोध सुरू आहे.