हॉटसिटी भुसावळचे तापमान पोहोचले ४२ अंशांवर

तापी भुसावळ

भुसावळ >> हॉटसिटी असलेल्या भुसावळ शहराचा पारा रविवारी तब्बल ४२ अंशांवर पोहोचला. यंदाच्या उन्हाळ्यात हे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले. एप्रिल देखील तापदायक ठरण्याची शक्यता आहे.

यंदा मार्चच्या पहिल्याच पंधरवड्यात शहराच्या तापमानाने चाळिशी ओलांडली होती. यानंतर २८ मार्चला रविवारी कमाल तापमान ४२ अंशांवर पोहोचले. यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच कमाल तापमान वाढल्याने शहराची लाहीलाही झाली. याचा जनजीवनावर विशेषता ग्रामीण भागात शेती कामांवर परिणाम झाला.

रविवारी सकाळी दहा वाजेपासून वातावरणात उष्णता निर्माण झाली. मात्र रविवारी शहरात कोरोना लॉकडाऊन म्हणजेच विशेष कठोर निर्बंध असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. पण घरात बसूनही उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. सायंकाळी साडेपाच नंतर उष्णता काहीशी कमी झाली. मात्र निर्बंधांमुळे वातावरणात गारवा झाल्यानंतरही रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता.