भुसावळात पोलिसांची धाड ; ५३ हजारांचा गुटखा जप्त

क्राईम भुसावळ

भुसावळ >> गुप्त माहितीवरून शहरातील डायमंड कॉलनीतील आवेश पार्कमधील घरातून ५३ हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी मंगळवारी रात्री जप्त केला.

संशयित यासीन उर्फ आज्जु अन्वर शेख याच्या घरातून पोलिसांनी गुटखा, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शेख याला ताब्यात घेतले.

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना गुटख्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे बाजारपेठचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, श्रीकृष्ण देशमुख, सचिन चौधरी, संकेत झांबरे, विशाल सपकाळे यांनी संशयिताचे घर गाठले.

घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून ३० हजार ८८८ रूपये किमतीची विमल पान मसाल्याची ८८ पाकिटे, १६ हजार ४५६ रूपये किमतीची १५६ पाकिटे सुंगधी तंबाखू आढळली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी रात्रीदेखील खडका रोडवरील संशयित तौसिक खान याच्या पानटपरीतून ५ हजार ३२४ रूपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर २४ तासात पुन्हा दुसरी कारवाई झाली.