भुसावळ-वांजोळा गावात पाच वर्षीय मूकबधिर मुलीवर अत्याचार

क्राईम निषेध भुसावळ

भुसावळ >> तालुक्यातील वांजोळा येथे एका पाच वर्षीय मूकबधिर बालिकेवर तिच्याच नात्यातील ३० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संशयित मंगल भील यास तात्काळ अटक केली आहे.

बालिका घरी एकटी असताना नराधमाने तिला सायकलवर बसवत स्वत:च्या घरी आणून अत्याचार केला. याच वेळी पीडीत बालिकेचे वडील कामावरून घरी आले. त्यांना घरात मुलगी न दिसल्याने त्यांनी शोधाशोध केली. संशयिताच्या घराजवळ त्यांना बालिकेचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी घराचे दार उघडल्यावर नराधमाचे कृत्य समोर आले.

मुलीची आई शेतातून घरी आल्यावर मुलीच्या वडिलांनी त्यांना घडलेली घटना सांगितली. त्यामुळे पीडीतेच्या आईवडिलांनी भुसावळ तालुका पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ बालिकेस डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज तथा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तसेच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली.