गॅससिलिंडरचा स्फोट; भडगाव तालुक्यातील महिंदळेत झोपडी खाक

क्राईम भडगाव

प्रतिनिधी भडगाव >> तालुक्यातील महिंदळे येथे सकाळी ८ वाजता रघुनाथ लोटन सावकारे यांच्या झोपडीत गॅस सीलिंडरने पेट घेतला त्यामुळे झोपडीस आग लागली. याचवेळी सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होती की सिलिंडर फुटल्यानंतर त्याचा एक भाग मिळालाच नाही. यात झोपडी व घरातील पैसे, दागिने व पूर्ण संसाराची राखरांगोळी झाली. सुदैवाने समय सुचकतेमुळे जीवित हानी मात्र टळली.

महिंदळे येथील रघुनाथ लोटन सावकारे हे आपल्या गावाशेजारील शेतात पत्नीसह झोपडी वजा घरात गेल्या अनेक वर्षपासून राहतात. गुरुवारी सकाळी अंघोळ करून ते काही कामानिमित्त गावात आले होते. तर पत्नी घरात स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतला. त्यानंतर झोपडीला आग लागली. आग लागल्यानंतर सावकारे यांच्या पत्नीने गावाकडे धाव घेतली. परंतु, आगीने उग्र रूप घेतल्यामुळे सिलिंडरचा स्फोट झाला.

ही झोपडी गावापासून दूर असल्यामुळे मोठी हानी टाळली. यात, मात्र हे गरीब कुटुंबाचे कष्टाने कमावलेले व कपाशी विकून घर बांधण्यासाठी ठेवलेले ५० हजार रुपये, दागिने, वर्षभर पुरेल एवढा धान्यसाठा, कपडे तसेच इतर सर्व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.

घटनेचा तलाठी पूनम वरकड यांनी पंचनामा केला. दरम्यान, हे कुटुंब आजच उघड्यावर आले असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केली. त्यांना मदत उपलब्ध करून देण्याबाबत नागरिकांकडून प्रयत्न सुरू होते.