अतिवृष्टी झालेल्या नुकसान भरपाईपोटी मतदारसंघासाठी 10 कोटी आमदार अनिल पाटील यांचे प्रयत्नांना यश..!

Politicalकट्टा अमळनेर

अखेर दिलासा अमळनेर मतदारसंघात १९ हजार हेक्टरला बसला होता फटका

अतिवृष्टीत नुकसान; ५२ गावांतील शेतकऱ्यांना भरपाईचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी अमळनेर ::>
एकूण ११ पैकी १० कोटी निधी अमळनेरसाठी

अमळनेर तालुक्यात जून ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई न मिळाल्याने नाराजीचे सूर होते. ही स्थिती पाहता पुरवणी मागण्यांवरील चर्चेत नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने शुक्रवारी आदेश दिले. त्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे.

या निर्णयाचा अमळनेर तालुक्यातील ५२ गावांतील सुमारे २३ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ होईल. मात्र, यापैकी ज्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना ही भरपाई मिळणार नाही. दरम्यान, नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी ११ कोटी रुपये प्राप्त होतील. त्यापैकी एकट्या अमळनेर मतदार संघाला १० कोटी रुपये मिळणार आहेत.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा पार पडली. त्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १५ हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे सांगितले गेले.

या आर्थिक तरतुदीतून जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षी अतिवृष्टीत झालेल्या नुकसान भरपाईचा देखील समावेश केला आहे. यामधून अमळनेर मतदार संघातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आमदार अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

त्याप्रमाणे ११ ऑगस्टच्या आदेशानुसार नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. या निर्णयानुसार तालुक्यातील ५२ गावांतील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यापैकी कर्जमाफीचा लाभ घेतलेले वगळून इतरांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रस्तावातील त्रुटी दूर
तालुक्यातील ५२ गावांतील २३ हजार १९४ शेतकऱ्यांच्या १९ हजार ४१३ हेक्टरमधील शेती पिके व फळ पिकांचे अतिवृष्टीत नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर झाला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरात फुटकी कवडी देखील पडली नाही. विशेष म्हणजे नुकसान भरपाई, इतर मदत किंवा कर्जमाफी देखील मिळाली नव्हती. हा तिढा आमदार पाटील यांनी प्रस्तावातील त्रुटी दूर करून सोडवला आहे.

आर्थिक कोंडी फुटेल
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आमदार पाटील यांनी दोनवेळा मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याशी चर्चा केली. विभागीय आयुक्त राजाराम माने, विभागीय अधिकारी, तहसीलदारांसोबत बैठका घेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी, हा मुद्दा रेटून धरला. त्यास शुक्रवारी यश आले. परिणामी आर्थिक कोंडी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे लवकरच भरपाईची रक्कम मिळणे शक्य होईल.
गजानन पाटील अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *