कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा जिल्ह्यात हे शहर उद्यापासून ३ दिवस बंद

Jalgaon अमळनेर कोरोना जळगाव जळगाव जिल्हा लॉकडाऊन

अमळनेर प्रतिनिधी>> शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी पुन्हा शनिवार व रविवार असे दोन दिवस तर पालिकेने सोमवारी शहरात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमळेनर शहरात तीन दिवस कडकडीत बंद पाळला जाणार आहे.

सोमवारी जनता कर्फ्यू असल्याने शहरातील आठवडे बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची साखळी तुटण्यास मदत मिळून मृत्यूचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होणार असून या संदर्भात प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.

अमळनेर शहरासह तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. तर मृत्यूचे प्रमाण ही वाढले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रांत सीमा अहिरे यांनी शनिवारपासून रविवारपर्यंत दोन दिवस अमळनेर पालिका हद्दीतील सर्व बाजारापेठ, आठवडे बाजार बंद तसेच किराणा दुकाने, अनावश्यक इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भाजीपाला, फळ विक्री केंद्र बंद राहिल. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद तसेच हॉटेल, रेस्टॉरंट होम डिलिव्हरी वगळता बंद राहतील. तर सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळ, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहिल. निर्बंधातून दुध विक्री केंद्र, वैद्यकिय उपचार व सेवा, मेडिकल, अॅम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक यांना सुट मिळणार आहे.

अमळनेर नगरपालिकेच्या हद्दीत लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करण्याची जबाबदारी संयुक्तीकरित्या पोलिस व पालिका प्रशासनाची राहिल. दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार संबंधित दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, असे पत्र प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

अलीकडे मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्या तरी होम क्वारंटाईन असलेले नागरिक रस्त्यावर दिसतात. होम क्वारंटाईन असलेले रुग्ण गावात फेरफटका मारत असल्याचे दिसत आहे. तर काही तरुण टवाळक्या करत फिरतात. त्यांच्यावर काहीच कर्फ्यूचा परिणाम झालेला नाही. कुणीही कठाेर कारवाई करत नसल्याने ही मंडळी दिवसभर रस्त्यावर मोकाट फिरते. प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.