रिक्षात बसलेल्या दांपत्याचे तीन लाखांचे दागिने लंपास

क्राईम चोरी, लंपास निषेध पाेलिस

प्रतिनिधी अमळनेर >> वावडे येथे घेऊन जाण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलेल्या वृद्ध दाम्पत्याचे सुमारे ३ लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली. ही घटना ८ डिसेंबरला दुपारी ३ वाजता ढेकू रोडवर घडली.

वावडे येथील आनंदराव पाटील व पत्नी कस्तुरीबाई हे मंगळवारी मध्य प्रदेशातून अमळनेरला परतले. बसस्थानकावरून बाहेर निघून ते वावडे जाण्यासाठी एका रिक्षात बसले. त्यात आधीच दोन महिला बसल्या होत्या.

दरम्यान, चालकाने ढेकू रोडवर अॅड.ललिता पाटील यांच्या घराजवळ महिलांना भडगाव जाण्यासाठी स्थानकावर सोडून येतो, असे सांगत वृद्ध दाम्पत्यास रिक्षातून खाली उतरवले. मात्र, तो परत न आल्याने दाम्पत्य दुसऱ्या वाहनाने वावडे गेले.

घरी गेल्यावर त्यांना प्रत्येकी ३ तोळे वजनाचे आणि प्रत्येकी ९० हजार रुपये किमतीच्या बांगड्या, हार व पोत व रोख रक्कम असा २ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला गेल्याचे समजले.

यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी रिक्षा क्रमांक आणा, मग गुन्हा दाखल करतो असे सांगून त्यांना परत पाठवले. ही बाब त्यांनी आमदार अनिल पाटील यांना सांगताच गुन्हा दाखल झाला.