वीज वितरणच्या जिल्हा बैठकीत आ.अनिल पाटलांनी मांडल्या समस्या.

Politicalकट्टा अमळनेर कट्टा सिटी न्यूज

पालकमंत्रीच्या उपस्थितीत झाली बैठक, अमळनेर मतदारसंघासाठी दिले नवीन प्रस्ताव.

अमळनेर प्रतिनिधी >> जळगाव येथे झालेल्या वीज वितरणच्या बैठकीत अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आ.अनिल पाटील यांनी मतदारसंघातील वीज समस्येबाबत अनेक प्रश्न मांडून नवीन कामांचे प्रस्ताव व प्रलंबित कामे सादर केली. जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि 12 रोजी जळगाव येथे ही बैठक पार पडली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत शेती व गावठाणच्या वीज समस्येबाबत चांगलेच धारेवर धरले. यावेळी शासन स्तरावर प्रलंबित असलेले जिल्ह्यातील विद्युत उपकेंद्र, पथदिव्यांच्या बळकटीकरण करण्याचा प्रस्ताव, सिंगल फेज फिडर सेपरेशनचा प्रस्ताव, गावातील व शेतातील वर्षानुवर्षांपासून जीर्ण पोल व तारांचा प्रस्ताव, सौर कृषी वाहिनी अंतर्गत नवीन गावांचा समावेश बाबत प्रस्ताव, जळगाव विद्युत मंडळ कार्यालयाचे विभाजन करण्याचा नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यानीं वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेत.

याबाबत वीज वितरणाच्या कामांसाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील उर्जा विभागाच्या नवीन व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, यावेळी आ. अनिल पाटील यांच्यासह आ.किशोर पाटील, आ.संजय सावकारे, तसेच जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, अधिक्षक अभियंता श्री.शेख, श्री. मानकर यांच्यासह वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी पालकमंत्रीनी जिल्ह्यातील नागरीकांना व शेतकऱ्यांना वीजेचा सुरळीत पुरवठा व्हावा, याकरीता जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर केलेली व प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावी विशेषत: शेतकऱ्यांना आवश्यक असलेले वीज कनेक्शन, तसेच शेतीला पाणी देण्यासाठी लागणारे ट्रान्सफॉर्मर वेळेत देण्याची कामे तातडीने हाती घेण्यात येऊन वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यात यावे व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार यांची अधिकाऱ्यांनी बैठक घेण्याबाबत सूचना दिल्यात.

शेती पंपासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेत जिल्ह्यातील पात्र गावांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा व त्यासाठीसर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री पाटील यांनी दिले. तर आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर मतदार संघातील वीज वितरणाशी संबंधित नवीन कामांचे प्रस्ताव, प्रलंबित कामे बैठकीत मांडली त्यावर तातडीने कार्यवाही करुन आमदारांना अहवाल सादर करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्यात.

आ.अनिल पाटलांनी सादर केलेली कामे- अमळनेर मतदारसंघासाठी आ.अनिल पाटील यांनी विविध नवीन प्रस्ताव व कामे या बैठकीत सादर केली यात नवीन व जुन्या 33 के व्ही वाहिन्या 220 केव्ही उपकेंद्रातून जोडण्याबाबत नवीन आयपीडीएस 33 के व्ही उपकेंद्र,33 के व्ही पातोंडा लाईन स्थलांतरित करणे, 33 के व्ही सारबेटे नवीन लाईन, 33 के व्ही गांधली, 33 के व्ही सारबेटे उपकेंद्र, 33 के व्ही एमआयडीसी, मारवड, शेळावे, अमळनेर शहर, वावडे, कळमसरे व इतर केंद्र बाबत समस्या मांडल्या. तसेच पॉवर ट्रान्सफार्मार क्षमता वाढ, शेतीपम्प, वाहिन्या भूमिगत करणे, सिंगल फेज वाहिन्या थ्रीफेज करणे, ग्रामिण भागातील जीर्ण खांब बद्दलविणे, नादुरुस्त रोहित्र बद्दलविणे, ग्रामिण भागात अतिरिक्त पथदिवे व फेज वायर मंजूर करणे, जीर्ण उपकेंद्राच्या इमारती दुरुस्त करणे आदी कामे सादर केली.