अमळनेरात जनता कर्फ्यूला व्यापारी महासंघाचा विरोध ; निर्णय घेताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप

Politicalकट्टा अमळनेर कट्टा

अमळनेर >> येथील उपविभागीय कार्यालयात गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी शहरात दर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, शहरातील अनेक संघटनांकडून या निर्णयास विरोध होत आहे. तसेच व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या अमळनेर शहर व्यापारी महासंघाने देखील या जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला. त्यामुळे प्रशासन विरूद्ध व्यापारी असे चित्र निर्माण झाले आहे.

कोरोना नियंत्रणासाठी शहरात दर रविवारी जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाविरूद्ध सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जेठमल जैन यांनी आपण संघटनेचे अध्यक्ष असूनही प्रशासनातील अधिकारी बंदबाबत विचारत नाहीत. यापूर्वीचे बंदचे निर्णय घेताना व्यापारी महासंघासोबत चर्चा केली जायची. मात्र, आता तसे होत नाही. त्यामुळे यापुढील जनता कर्फ्यूबाबत व्यापारी महासंघासोबत चर्चा करावी. अन्यथा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू, असे सांगितले. कोषाध्यक्ष विवेक भांडारकर, सरचिटणीस मुकुंद विसपुते, झामनदास सैनानी आदींनी देखील हाच सूर आळवला.