अमळनेर >> धुळे रस्त्यालगत असलेले तीन मेडिकल दुकाने एका रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

या घटनेत दत्त हाउसिंग सोसायटीमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. विशाल बडगुजर यांचे उत्कर्ष मेडिकलचा कडी-कोयंडा तोडून १४ हजार ५०० रुपये रोख, विजय मारुती समोरील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद पाटील यांच्या हॉस्पिटलमधील जय योगेश्वर मेडिकलचा कडी-कोयंडा तोडून ३ हजार ४०० रुपये रोख तर तहसील कचेरी समोरील डॉ. किरण बडगुजर यांच्या हॉस्पिटलमधील स्वर्णिका मेडिकलचे लॉक तोडून ७ हजार ८०० रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

या घटनेत तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून यात तोंड झाकलेले तीन चोरटे दुकानात शिरलेले स्पष्टपणे दिसत आहेत. याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत तिन्ही दुकानांच्या मालकांनी अमळनेर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *