बेरोजगारीच्या नैराश्यातून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

अमळनेर आत्महत्या क्राईम

अमळनेर प्रतिनिधी>> बेरोजगारीच्या नैराश्यातून भिलाली ता.अमळनेर येथील २५ वर्षीय तरुणाने गुरुवारी (दि.१७) राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी १ वाजता हा प्रकार उघडकीस आला. अनिल शांताराम माळी असे मृताचे नाव आहे.

नाशिक येथे गेलेला अनिल माळी हा पाच-सहा वर्षांपासून खासगी नोकरी करत होता. मात्र, कोरोनामुळे या नोकरीवर देखील टाच आल्याने त्याला घरचा रस्ता धरावा लागला. घरी शेतीसह मिळेल ते काम तो करू लागला. दरम्यान, तिन्ही मुलींचे लग्न झाल्याने एकुलता एक असलेल्या अनिलच्या लग्नासाठी आई-वडिलांनी घराची दुरुस्ती पूर्ण करून घेतली. मात्र, गुरुवारी आई शेतात, तर वडील गावात भाऊबंदकीतील कार्यक्रमात गेल्याचे पाहून अनिलने घरातील शेवटच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार दुपारी १ ते २ वाजेदरम्यान त्यांच्या वडिलांच्या निदर्शनास आला. शेजारील छबिलदास घोडे यांनी पोलिस पाटलांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.जी.एम.पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला. यानंतर भिलाली येथे सायंकाळी अंत्यसंस्कार झाले.

कोरोनामुळे खासगी नोकरी गेली. आता थोडकी शेतजमीन, त्यात नोकरी नसल्याने लग्नाला अडचण येईल असे तो मित्रांना सांगत होता. या वैफल्यातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा होताना दिसली. पोलिस पाटील दगा पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाला. तपास हवालदार भास्कर चव्हाण हे करत आहेत.