बातमी का छापली ? म्हणत वाळूमाफियांची पत्रकारास मारहाण

रिड जळगाव टीम

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाळू माफियांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन या वाळू माफियांवर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न करत आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी संध्याकाळी ‘दैनिकात बातमी का छापली’ असे विचारत त्याचा संताप येऊन एका वाळूमाफियाने पत्रकार अजय पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी तालुका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे.त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये प्रशासन अद्यापही यशस्वी झालेले नाही. शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी एक क्लिप व्हायरल केल्यानंतर याबाबतची बातमी वृत्तपत्रात छापून होती. ती बातमी अजय पाटील यांनीच लावली असा समज करून संशयित भावेश पाटील उर्फ गोलू रा. आव्हाणां या डंपर मालकाने आव्हाणे गावाच्या बाहेर अजय पाटील यांना मित्रासोबत कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांना अडविले. त्यावेळी बातमी का छापली असे संतापात विचारले आणि शिवीगाळ करीत पोटात आणि अंगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तो निघून गेला.

या प्रकारानंतर अजय पाटील घाबरून गेले त्यांनी तालुका पोलीस स्टेशनला फोन करून हकीकत सांगितली. अजय पाटील लवकरच पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत. या घटनेचा समाजातील सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.