जळगाव प्रतिनिधी ::> पोलिस ठाण्यांच्या हद्दवादातून आसोदा रेल्वेगेटजवळ तब्बल चार तास अनोळखी तरुणाचा मृतदेह पडून असल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या तरुणाला धावत्या रेल्वेचा धक्का लागला किंवा धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आसोदा रेल्वेगेटला लागून रुळालगत तरुणाचा मृतदेह सोमवारी दुपारी चार वाजता आढळून आला. परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही घटना आली. यानंतर त्यांनी रेल्वे पोलिस, गेटमन यांना घटना कळवली. दरम्यान, ही माहिती मिळाल्यानंतर देखील चार तासापर्यंत पोलिस, रेल्वे पोलिस घटनास्थळी आले नाही.
दरम्यानच्या काळात मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तालुका, शनिपेठ व लोहमार्ग पाेलिस या तिघांच्या हद्दवादामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास पोलिस आलेच नाही. अखेर पोलिस ठाण्याची हद्द निश्चित झाल्यानंतर रात्री ८ वाजता तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आणला. गेटमन सौरभ भारंबे यांच्या माहितीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.