केळी खरेदीत १० लाखांवर फसवणूक; व्यापाऱ्यास अटक

Jalgaon क्राईम जळगाव शेती

जळगाव प्रतिनिधी ::> जिल्ह्यातील केळी व्यापाऱ्याकडून केळीची खरेदी करून त्याचे पैसे न देता १० लाखांवर फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला जळगाव शहर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.

संतोष रामनरेश गुप्ता (रा.अतुल टॉवर, हिराणेवाडी केळी मार्केट कांदिवली, मुंबई) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. केळी व्यापारी शालिक दौलत सोनवणे (रा.वराडसीम, ता.भुसावळ) हे सू्र्यकांत विधाते यांच्यासोबत जळगाव शहरातील जयकिसान केला सप्लायर्सच्या माध्यमातून परराज्यात केळी विक्रीचा व्यापार करतात. ते गुप्ता याच्याशी फोनवर बोलणी करून केळी मुंबईला पाठवत होते.

२० एप्रिल २०१८ ते १५ जुलै २०१९ पर्यंत केळीची मागणी केल्याप्रमाणे सोनवणे यांनी केळीचे ट्रक भरून कांदिवलीला पाठवल्या होते. एकूण ३७ लाख ८२ हजार ५२४ रुपयांची केळी गुप्ता याला पाठवली होत्या.

१४ सप्टेंबर २०१९पर्यंत त्याने सोनवणे यांना २७ लाख ६१ हजार ५२४ रुपये दिले. मात्र १० लाख २० हजार ९४२ रुपये त्याच्याकडे बाकी होते. वेळोवेळी मागणी करूनही त्याने सोनवणे यांना पैसे दिले नाही. भेटण्यासाठीही टाळाटाळ करीत होता.

या प्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुप्ता यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली. मंगळवारी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.