विशेष पथकाने एरंडोलमध्ये १० जुगाऱ्यांना केली अटक

एरंडोल क्राईम

एरंडोल >> नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांच्या पथकाने २५ नोव्हेंबरच्या रात्री एरंडोल शहराजवळ महामार्गावरील हॉटेल शेर-ए-पंजाबच्या बाजूला शेतात चालणारा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला.

वंजारी वाट रस्त्याच्या बाजूला बापू चौधरी यांचे लिंबू बागेत हा जुगाराचा डाव रंगला होता. पथकाने तेथे छापा टाकून १० जुगारींना ताब्यात घेत १ लाख रुपये रोख आणि १० दुचाकी जप्त केल्या.

बापू चौधरी यांच्या शेतातील जुगार अड्ड्याची माहिती मिळताच डॉ.दिघावकर यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकातील एपीआय सचिन जाधव, उपनिरीक्षक संदीप जाधव, हवालदार नितीन सपकाळ, उमाकांत खापरे, विश्वेश हजारे, दीपक ठाकूर, अमोल भामरे, सुरेश टोंगरे यांनी २५ नोव्हेंबरला छापा टाकला.

त्यात १० जणांना पकडून १ लाख ५ हजार २६० रुपये रोख आणि १० दुचाकी व ३ हजार ५० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एरंडोल पोलिसांत दाखल गुन्ह्यात तपास राजू पाटील, विकास देशमुख करत आहेत.