मयुर मेढे । फैजपूर, कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यानंतर शहरातील सुभाष चौक येथील जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस येथे तळीरामांच्या अक्षरशः उड्या पडताना दिसत आहे. जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस समोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.
या तळीरामाच्या गर्दीत विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शहरातील वातावरण बिघडल्यास यास जबाबदार कोण राहणार ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून निर्माण होत असून शहरातील जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस लॉकडाउन संपेपर्यंत बंदच ठेवण्यात यावे अशी मागणी शहरातून होत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
शहरातील जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस या दारुच्या दुकानाबाहेर मोठ्या संख्येने लोकांनी रांगा लावल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले. काही जणांनी मास्क लावले होते, मात्र अक्षरशः एकमेकांना चिकटून उभे राहिल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मद्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात नसतील, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. मात्र इथे सर्रास हे नियम धाब्यावर बसवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
जळगांव जिल्हा रेडझोन मध्ये असल्याने मद्य विक्री होत असल्याने त्याचा परिणाम कोविड-१९ हा आजार वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे. म्हणून दिलेले मद्य विक्रीचे आदेश मागे घेण्यात यावे अशी मागणी होत आहे.
जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस बंदच ठेवावे
जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस समोर हाकेच्या अंतरावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. गर्दीत तळीराम दारूच्या नशेतून कळत-नकळत काहीही करू शकता व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व शहरात जातीयवादी तेढ निर्माण होऊन वातावरण बिघडू शकते. यामुळे संबंधित प्रशासनाने शहरातील जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस लॉकडाउन संपेपर्यंत बंदच ठेवावे अशी मागणी शहरातून होत आहे.