तिघांच्या त्रासामुळे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या

रिड जळगाव टीम

प्रतिनिधी चाळीसगाव >> गेल्या १५ दिवसांपासून तीन तरुण १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरासमोर येऊन इशारे करून त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून मुलीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याची घटना खेरडे (सोनगाव) (ता.चाळीसगाव) येथे दि. १८ रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

पीडीत मुलीच्या वडीलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या १६ वर्षीय मुलीस गावातील विशाल एकनाथ जाधव, विलास पुरनदास चव्हाण आणि पप्पू चरणदास चव्हाण हे १५ दिवसांपासून त्रास देत होते. तिघे संशयित मुलीच्या घरासमोर येऊन इशारे करत होते. या तिघांच्या त्रासाला कंटाळून मुलीने १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. या घटनेत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी विशाल जाधव, विलास चव्हाण व पप्पू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संपत आहेर करत अाहेत. तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.