जालन्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ दिवसांपूर्वी अंत्यविधी झालेली व्यक्ती घरी परतल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे कुटुंबियांनी कोणा दुसऱ्याच व्यक्तीचाच अंत्यविधी केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील रेल्वेस्टेशन भागात ४ दिवसांपूर्वी एका वाहनाच्या चाकाखाली येऊन अज्ञात इसमाचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचवेळी अडीच महिन्यापासून चंदनझिरा परिसरातील सुभाष प्रकाश जाधव नावाचा व्यक्ती हरवलेला होता. सुभाष जाधव आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु झालेल्या व्यक्तीचे वर्णन हुबेहूब जुळत असल्याने या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी सुभाष जाधव यांच्या कुटूंबियांना दिली.

अंत्यविधीनंतर काल ४ दिवसांनी चक्क अंत्यविधी झालेले सुभाष जाधव घरी परत आल्याने कुटूंबियांसह परिसरातील नागरीकांना धक्काच बसला. आपण तर ऊस तोडीसाठी सोलापूरला गेलो असल्याचे त्यांनी सांगितल्याने सगळेच चक्रावून गेले आणि मग आपण दुसऱ्याच कुणा व्यक्तीचा अंत्यविधी केल्याचं लक्षात आल्यावर जाधव कुटूंबियांनी ही घटना पोलिसांना कळवली आहे. सुभाष जाधव जिवंत घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय. मात्र, परिसरात या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *