जामनेरात दाम्पत्याला मारहाण करत साडेआठ लाखांचा ऐवज लंपास

क्राईम जामनेर

जामनेर : शहरातील गिरीजा कॉलनी भागातील भरवस्तीत चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत लाखोंचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गिरीजा कॉलनी भागातील भरवस्तीत राहणारे बळीराम जयराम माळी(वय-७५) यांच्या घरात पहाटे तीनच्या सुमारास घराच्या मागील बाजूने घरात प्रवेश करून चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली. यात बळीराम माळी यांना एका चोरट्याने गळ्याला हाताने गळा आवळुन पैसे कुठे आहेत ते सांग नाहीतर तुला संपवून टाकू अशी धमकी देत त्यांच्या जवळील कमरेला असलेल्या चाव्या हिसकावून घेतल्या.

चोरट्यांनी झाडाझडती घेतली असता त्यांना एक लोखंडी जुनी पेटी आढळून आली. चोरट्यांनी पेटी घेऊन पोबारा केला. बळीराम माळी यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांनी ८ लाख ५० हजार रोख, १० हजार रुपयांचे सोन्याचे बिस्कीट, व ५०० रु.किमतीची लोखंडी पेटी असा सुमारे ८,६०,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात जामनेर पोलीसात भा.द.वी.कलम-गु.र.नं-०१४२/२०२०,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेचा पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *