जळगावात दोन गटात तुफान हाणामारी; १५ जणांविरुद्ध गुन्हा

क्राईम जळगाव

जळगाव : दोन वर्षापूर्वी झालेल्या वादातून असलेली केस मागे घेण्याच्या कारणावरून बागवान मोहल्लात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी दोन गटात परस्पराविरोधात १५ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे शहरातील जोशीपेठ सील करण्यात आलेले आहे. त्यात या परिसरात ‘केस मागे घेण्याच्या’ कारणावरून तुफान हाणामारी झाली. सर्रास लाकडी मोगरी, लोखंडी रॉड आदींचा यात वापर करण्यात आला.

यात एक गटातील शेख मोहसीन शेख सलीम (३८, रा.बागवान मोहल्ला, जोशीपेठ) यांच्या तक्रारीनुसार, ते घरी असताना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घराजवळीच ८ जण हे त्याठिकाणी आले. आणि “न्यायालयातील केस मागे घे” असे म्हणाले, त्यावर शेख मोहसीन याने न्यायालयात केस सुरू असल्याचे म्हणताच त्याचे वाईट वाटून त्या ८ जणांनी त्यास जबर मारहाण केली. एकाने शेख मोहसीन याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली़ त्यात तो जखमी झाला. त्यानंतर मोहसीन याच्या फिर्यादीवरून मारहाण करणा-या आठही जणांविरूध्द शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोक्यात मारली मोगरी
तसेच दुसऱ्या गटातील अल्लाबक्ष रईस बागवान (रा़ बागवान मोहल्ला, जोशीपेठ) यांच्या तक्रारीनुसार ते त्यांच्या दुचाकीने (क्र एमएच १९ सीएल ७७१३) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अंजिठा चौफुलीकडे जाण्यासाठी घराजवळून निघत असताना, त्याचवेळी सिबान रईस बागवान, अरबाज बागवान, गुड्डु सलीम बागवान, रईस युसूफ बागवान, सैफुल्ला सलीम बागवान, वसीम उर्फ मच्छी सलीम बागवान, कलीम गुलाम रसुल बागवान हे त्याठिकाणी आले व त्यांनी दुचाकी रस्त्यात अडविली़ त्यावेळी त्यांनी न्यायालयात दाखल असलेली केस मागे घे असे म्हणत अल्लाबक्ष यास मारहाण करण्यास सुरूवात केली़ सिबान याने बाजूला असलेली लाकडी मोगरी उचलून ती अल्लाबक्ष याच्या डोक्यात मारली. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर मारहाण करणाऱ्याविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *