चोपडा शहरात दीड लाखाचा गुटखा जप्त

क्राईम चोपडा

प्रतिनिधी चोपडा >> शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पाटीलगढी भागात गुरुवारी सकाळी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दिड लाखांचा गुटखा व साडेतीन लाखाची रिक्षा असा एकूण पाच लाखाचा मुद्देमाल रंगेहाथ पकडून जप्त केला आहे.

पाटील गढी भागात गुरुवारी सकाळी गुटखा व सुगंधित पान मसाल्याची रिक्षा येत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळाली हाेती. त्यानंतर पोलिस पथकाला सापळा लावून कारवाईचे आदेश चव्हाण यांनी दिले. पाटीलगढीतील बाबुराव कौतिक मराठे यांच्या घराजवळ गुरुवारी सकाळी ११ वाजता पिवळ्या रंगाची रिक्षा (एमएच- १९, ३७२१) अाली.

पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलिस नाईक संतोष पारधी, शेषराव तोरे, ज्ञानेश्वर जवागे, कॉन्स्टेबल गजानन पाटील, सुभाष सपकाळ, सुमेर वाघेर यांच्या पथकाने रिक्षावर धडक कारवाई केली. रिक्षातील १ लाख ५० हजारांचा विमल गुटखा व सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल आढळला.

पथकाने येथील आकीब खान अस्लम खान (वय २०) याला रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी कॉन्स्टेबल सुमेर वाघेर यांच्या फिर्यादीवरून आकीब खान व आकाश अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.