खानदेशातील ग्रामीण भागात शेवया, पापड, कुरड्या बनविण्यासाठी गृहिणींची लगभग…

कट्टा ब्लॉगर्स कट्टा माझं खान्देश

घरात वर्षभर लागणाऱ्या शेवया, पापड, वडे, वेफर्स, कुरड्यांच्या निर्मितीसाठी ग्रामीण भागातील महिलांची गेल्या काही दिवसांपासून लगबग वाढली आहे. एकमेका साह्य करूच्या भूमिकेतून शेजारीपाजारी राहणा-या महिला त्यासाठी एकत्र येत असून, सगळीकडे उन्हाळा संपण्यापूर्वी सर्व साहित्य तयार करण्याची धांदल वाढल्याचे दिसून येत आहे.

साधारण अक्षय तृतीयेनंतर ग्रामीण भागात शेतीची कामे आटोपलेली असतात. शेतीकामात गुंतलेल्या महिला या दिवसात घरातील आवरसावर करण्यासह कुटुंबाला वर्षभर लागणा-या जिन्नसांच्या निर्मितीवर त्यामुळे भर देतात. घराघरात पापड, कुरड्या, शेवया, बटाटा व साबुदाण्याचे वेफर्स, चकल्या, वडे, कुरड्या आदी खाद्य साहित्यांचा साठा तयार करण्याचे नियोजन करण्यात येते.

अर्थात, एकट्या दुकट्या महिलेला सर्व साहित्य तयार करण्याकरिता अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी भल्या पहाटे उठून अंगणातच चूल पेटवली जाते. शेजारी राहणा-या महिला एकत्र येऊन टप्याटप्याने हे साहित्य करण्याचे काम हाती घेतात. त्यासाठी एकमेकांत समन्वयदेखील ठेवला जातो. एकाच दिवशी सर्वजणी साहित्य तयार करण्याचे काम करीत नाही.

चिकाच्या कुरड्या, नागलीसह उडदाचे पापड, बिबडे, शेवया आदी साहित्य उन्हाळ्याच्या या मोसमात तयार करीत असताना महिलांना थोडीही उसंत नसते. सवडीने हे पदार्थ तयार करावे लागत असल्याने अनेक महिला एकत्र येऊन दुपारच्या वेळी घरातील नियमित कामे आटोपून साहित्य तयार करताना दिसतात.

गावाकडून शहरांमध्ये नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेकजण गेलेले असतात. त्यांना पापड, कुरड्या वगैरे पदार्थ घरी बनवणे शक्य नसते. त्यांच्यासाठी खास घरगुती चव असणा-या साहित्याचे पार्सल पाठविण्याची काळजीदेखील ग्रामीण भागातील त्यांचे नातेवाईक घेतात. त्याहिशेबाने जास्तीचे साहित्य तयार करण्याचे नियोजन उन्हाळ्यात केले जाते.

सोयीनुसार नंतर तयार साहित्य बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून रवाना करण्यात येते. काही गावांमध्ये बचतगटांच्या महिला मागणीनुसार पापड, कुरड्या तयार करून देण्याचे काम करतात. साहित्याचे दर नगाप्रमाणे ठरलेले असतात. शहरी भागातील नागरिक घरगुती स्वादाच्या साहित्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतात.

तंत्रज्ञानाच्या आविष्कारावर हातांची मात विविध प्रकारचे पापड तसेच शेवया तयार करण्यासाठी अलिकडे लहान व मोठी यंत्रे उपलब्ध झाली आहेत. शहरी भागात विशेषकरून या यंत्रांचा प्राधान्याने वापर होत असला तरी ग्रामीण भागात अद्याप यंत्रांना म्हणावा तसा वाव मिळू शकलेला नाही.

हाताने तयार केलेल्या अस्सल घरगुती स्वादाच्या पापड, कुरड्या व शेवयांची चव यंत्राच्या साहाय्याने तयार झालेल्या साहित्याला कधीच येत नाही. त्यामुळे आपला हात जगन्नाथ, असे म्हणत गृहिणी स्वत:च्या हाताने तयार केलेल्या साहित्याला पहिली पसंती देतात. त्यासाठी त्यांना कितीही कष्ट सहन करावे लागले तरी त्या मागे हटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *