केळीचे भाव जाहीर होत नसल्याने यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल

किनगाव यावल रावेर साकळी

यावल प्रतिनिधी >> येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर पूर्वीपासून केळी बोर्डाचे भाव एका फलकाद्वारे जाहीर केला जायचे. त्यामुळे शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे ठिकठिकाणच्या केळीच्या भावाची माहिती मिळायची. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील फलक गायब झाला असून परिणामी सर्वसामान्य शेतकऱ्यांना केळीचे भाव कळत नसल्याची परिस्थिती आहे. बाजार समितीकडे मागणी करूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत.

या ठिकाणी पूर्वीप्रमाणे बोर्डवर केळी भावाची माहिती प्रसिद्ध केली जावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे. या बाबत येथील बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, फलक जीर्ण झाला असल्याने नवीन फलक तयार करण्यात येत आहे. तो तयार झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे या ठिकाणी केळी भाव जाहीर करण्यात येतील. शेतकऱ्याची याबाबतची समस्या लवकरच दूर होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. नवीन फलक तयार होऊन कधी लागतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.